बेळगाव सीमाभागात सातत्याने मराठी भाषिकांच्या हक्कासाठी आवाज उठवणारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांच्यावर ‘गुंडा ॲक्ट’ अंतर्गत कारवाई करून त्यांना हद्दपार करावे, या मागणीसाठी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या (करवे) चिकोडी तालुका घटकाने कोल्हेकुई सुरु केली आहे.

यासंदर्भात चिकोडीच्या तहसीलदारांमार्फत राज्याच्या गृहमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले असून, शुभम शेळके यांना ‘रौडीशिटर’ घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी विश्रामगृहापासून तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढत तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी ‘करवे’चे तालुकाध्यक्ष संजू बडिगेर आणि तालुका गौरव अध्यक्ष चंद्रकांत हुक्केरी यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि समिती नेत्यांवर तोंडसुख घेतले.
या मूठभर कार्यकर्त्यांच्या आंदोलनात अप्पासाहेब हिरेकोडी, रफिक पठाण, चंद्रशेखर अरभावी, शंकर अवरखान अशा कार्यकर्त्यांचा सहभाग होता. सीमाभाग शांततेत राहात असून जाणीवपूर्वक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कन्नड संघटनांवर प्रशासन कोणती कायदेशीर कारवाई करते याकडे मराठी भाषिकांचे लक्ष वेधले आहे.


Recent Comments