अखिल भारतीय वीरशैव महासभेचे माजी अध्यक्ष आणि माजी मंत्री भीमण्णा खंड्रे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वयाची १०२ वर्षे पूर्ण केलेल्या या ज्येष्ठ नेत्याने शुक्रवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण बिदर जिल्ह्यावर शोककळा पसरली असून, त्यांच्या पार्थिवावर भालकी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

भीमण्णा खंड्रे यांना काल दुपारी २ वाजल्यापासून श्वसनाचा तीव्र त्रास होऊ लागला होता. उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी गांधीगंज येथील खंड्रे यांच्या निवासस्थानी भालकी हिरेमठाचे डॉ. बसवलिंग पट्टद्देवरू आणि गुरुबसव पट्टद्देवरू यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक विधी पार पडले. यावेळी पुत्र ईश्वर खंड्रे, अमर कुमार खंड्रे, कन्या शकुंतला, नागम्मा, डॉ. आशा, डॉ. शोभा, भारती आणि नातू खासदार सागर खंड्रे यांच्यासह कुटुंबातील सदस्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, भीमण्णा खंड्रे यांच्या निधनानिमित्त आज (१७ जानेवारी) बिदर जिल्ह्यातील सर्व शासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवसाची भरपाई पुढील शनिवारी पूर्ण वेळ शाळा भरवून केली जाईल, असे शिक्षण विभागाच्या उपसंचालकांनी स्पष्ट केले आहे.
शतायुषी डॉ. भीमण्णा खंड्रे यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज संध्याकाळी भालकी येथे येणार आहेत. खंड्रे हे वनमंत्री ईश्वर खंड्रे यांचे वडील आणि खासदार सागर खंड्रे यांचे आजोबा होत. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते आर. अशोक, भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.


Recent Comments