कर्नाटकात अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री बदल निश्चित असल्याची शक्यता औद्योगिक पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष एस. जी. नंजय्यनमठ यांनी व्यक्त केली आहे.

विजापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्याच्या राजकारणात लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याचे संकेत दिले. मात्र, या संदर्भातील अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांडच घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. डी. के. शिवकुमार यांच्यामध्ये मुख्यमंत्री होण्याची पूर्ण पात्रता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या अर्थसंकल्पाची प्रक्रिया सुरू असल्याने मुख्यमंत्री बदलल्यास प्रशासन आणि अर्थसंकल्पावर परिणाम होऊ शकतो, म्हणून हा निर्णय लांबणीवर पडला असावा, असे त्यांनी नमूद केले. अर्थसंकल्प पूर्ण होताच या विषयावर हायकमांडकडून हालचाली होण्याची दाट शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले.
एआयसीसीने ठरवले तर डी. के. शिवकुमार आताही मुख्यमंत्री होऊ शकतात, कारण सर्व अधिकार त्यांच्याकडेच आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. सध्या मुख्यमंत्री बदलावर चर्चा करणे म्हणजे केवळ लोकांसाठी राजकीय मनोरंजन पुरवण्यासारखे आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्यात वारंवार मुख्यमंत्री बदलाबाबत कोणाही नेत्यांनी जाहीर भाष्य करू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हायकमांडच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष असून अर्थसंकल्पांनंतरची राजकीय परिस्थिती महत्त्वाची ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.


Recent Comments