बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरात एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिचे धर्मांतर करण्यासाठी ‘मतपरिवर्तन’ करून बंगळुरूला पळवून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अथणी पोलिसांनी अत्यंत कौशल्याने सापळा रचून ही कारवाई केली.
अथणी येथील एका पीयूसी विद्यार्थिनीची आरोपी शाहील याच्याशी त्याच्या एका नातेवाईक तरुणीमार्फत ओळख झाली होती. सुरुवातीला मैत्री वाढवून त्याने मुलीचा विश्वास संपादन केला आणि तिला दोन-तीन वेळा हॉटेलमध्ये नेले होते. याच मैत्रीचा फायदा घेऊन त्याने मुलीला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करण्यास सुरुवात केली होती.
पुढील काळात संपूर्ण देश मुस्लिम राष्ट्र होणार असून हिंदू धर्म सोडून इस्लाम स्वीकारल्यास लग्न करून सुखात ठेवेन, अशा आशयाचे व्हॉट्सॲप संदेश शाहील मुलीला पाठवत होता, अशी तक्रार पालकांनी केली आहे. २८ जानेवारी रोजी मुलगी १८ वर्षांची होणार होती, त्यानंतर तिच्याशी लग्न करण्याचा कट शाहीलने रचला होता. त्यासाठीच त्याने गेल्या आठवड्यात मुलीला बंगळुरूला पळवून नेले होते.
मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईने अथणी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सीपीआय संतोष हल्लूर यांनी तत्काळ दोन विशेष पथके तयार करून तपास सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी बंगळुरू येथून आरोपीला बेड्या ठोकल्या आणि मुलीची सुखरूप सुटका केली.


Recent Comments