Belagavi

पिरनवाडी येथे २२ जानेवारीला सर्वधर्मीय वधु-वर मेळावा

Share

पिरनवाडी येथील विनायक नगरमधील श्री सिद्धिविनायक सेवा संघातर्फे यावर्षी श्री गणेश जन्मोत्सव सोहळा २२ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या जन्मोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे सर्व समाजातील उपवधु-वरांसाठी आयोजित करण्यात आलेला भव्य मेळावा हे असणार आहे.

या उत्सवाच्या निमित्ताने पिरनवाडी परिसरात विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १८ जानेवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘हिंदू सण’ या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित केली असून विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. २१ जानेवारी रोजी महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम, सुजाता जितुरी यांचे ‘जीवनविद्या प्रबोधन’ आणि मच्चे येथील बसवेश्वर भजन मंडळाचा रात्रभर भजनाचा कार्यक्रम संपन्न होईल. मुख्य दिवशी म्हणजेच २२ जानेवारीला पहाटे ब्राह्ममुहूर्तावर पुजारी बसय्या संचाळमठ यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विनायकाचा अभिषेक, होम-हवन आणि पाळणा कार्यक्रम पार पडेल, तर दुपारी सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य असलेला सर्वधर्मीय वधु-वर मेळावा २२ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत पार पडणार आहे. या मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ५०० रुपये शुल्क भरून आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या मेळाव्यात घटस्फोटितांनाही सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती सेवा संघाचे यल्लाप्पा मिर्जी आणि बसवराज संभाळमठ यांनी दिली आहे.

Tags: