Belagavi

खुर्ची वाचवण्यासाठीच मुख्यमंत्र्यांचा विशेष अधिवेशनाचा बनाव : बी.वाय. विजयेंद्र

Share

मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे केवळ आपली खुर्ची वाचवण्यासाठी आणि वेळकाढूपणा करण्यासाठी विशेष अधिवेशनाचा घाट घालत असल्याची घणाघाती टीका भाजप प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांनी केली आहे. डी.के. शिवकुमार यांची कोंडी करण्यासाठीच हा सर्व खटाटोप सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.

शुक्रवारी बेळगाव विमानतळावर पत्रकारांशी बोलताना विजयेंद्र यांनी राज्य सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांविरुद्ध जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असून, केवळ द्वेषापोटी राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलावून एनडीए सरकारविरुद्ध वातावरण निर्मिती करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आली असून, जनतेसाठी नेमके काय केले यावर चर्चा करण्याचे आव्हान त्यांनी दिले.

केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी राज्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होण्यात काहीही गैर नसल्याचे विजयेंद्र यांनी स्पष्ट केले. कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्यासाठी दिलेले योगदान मोठे असून, त्यांनी पुन्हा राज्याच्या राजकारणात प्रवेश केल्यास आपण त्याचे स्वागतच करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

बळ्ळारी पदयात्रेवरून पक्षात सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य करताना विजयेंद्र यांनी सावध भूमिका मांडली. पदयात्रेबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी केंद्रीय नेतृत्वाला विश्वासात घेणे गरजेचे असून, यापूर्वीच्या पदयात्रांच्या वेळी निर्माण झालेला गोंधळ पुन्हा होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ही बाब आपण राज्यातील नेत्यांच्याही निदर्शनास आणून दिल्याचे त्यांनी नमूद केले.

भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड प्रक्रिया लवकरच पार पडणार असून, त्यानंतर या सर्व विषयांवर केंद्रीय नेत्यांशी सविस्तर चर्चा केली जाईल, असे विजयेंद्र यांनी सांगितले. पदयात्रेला आपला वैयक्तिक विरोध नसल्याचे स्पष्ट करत, आगामी निवडणुकांबाबत पक्ष योग्य रणनीती आखत असल्याचे त्यांनी शेवटी म्हटले.

Tags: