बेळगाव शहरातील अत्यंत गजबजलेल्या मध्यवर्ती आणि नवीन बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी आता कडक पावले उचलली आहेत. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी मार्केट पोलीस ठाण्यापासून ते नवीन बसस्थानकापर्यंत बॅरिकेड्स बसवण्यात आले आहेत.

नवीन बसस्थानकाच्या समोर बस येण्या-जाण्यासाठी रिक्षा आणि खासगी वाहनांमुळे मोठा अडथळा निर्माण होत होता. याचा फटका बस प्रवाशांसह सर्वसामान्य नागरिकांनाही बसत होता. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पोलिसांनी मार्केट पोलीस ठाणे ते कीर्ती हॉटेलपर्यंत रस्त्याच्या मध्यभागी बॅरिकेड्स लावून शिस्तबद्ध वाहतुकीसाठी मार्ग मोकळा केला आहे.
या मोहिमेबाबत माहिती देताना वाहतूक विभागाचे एसीपी जे.एस. निक्कम म्हणाले की, “बसस्थानकात बसेसना येण्या-जाण्यासाठी कोणताही अडथळा येऊ नये आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, या हेतूने हे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. सध्या बॅरिकेड्सची व्यवस्था केली असून, येणाऱ्या काळात रस्त्यावरील आणि पदपथांवरील अनधिकृत अतिक्रमणेही कडकपणे हटवण्यात येतील.” असे त्यांनी स्पष्ट केले.
बसस्थानक परिसरात रिक्षा आणि खासगी वाहनांच्या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे बसेसना वळण घेताना मोठी कसरत करावी लागत होती. आता पोलिसांनी लावलेल्या या बॅरिकेड्समुळे बेशिस्त पार्किंगला चाप बसणार असून, वाहन चालक आणि प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.


Recent Comments