खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी भागातील विद्यार्थी आणि बेळगाव-उद्यमबाग येथे कामाला जाणाऱ्या कामगारांची बसअभावी होणारी गैरसोय अखेर दूर झाली आहे. खानापूर तालुका ‘पंच गॅरंटी योजना’ अंमलबजावणी प्राधिकरणाचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्या विशेष प्रयत्नांमुळे गर्लगुंजी-बेळगाव ही सकाळची बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून ही बस सेवा विस्कळीत झाल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या कामगारांना आणि कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचणे कठीण झाले होते. ही समस्या लक्षात घेऊन सूर्यकांत कुलकर्णी यांनी जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या माध्यमातून परिवहन विभागाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊन आता सकाळी ७:०० वाजता खानापूरहून सुटणारी बस ७:१५ ला गर्लगुंजीत येईल आणि ८:०० वाजता बेळगावला पोहोचेल. तसेच सायंकाळी ५:३० वाजता ही बस बेळगावहून परत खानापूरला रवाना होईल.
या नवीन बस सेवेमुळे गर्लगुंजीसह बरगाव, भंडारगाळी, सानहोसूर, निडगल या गावांतील प्रवाशांनाही मोठा आधार मिळाला आहे. बसचे गावात आगमन होताच ग्रामस्थांनी पुष्पहार घालून आणि पूजा करून आनंद व्यक्त केला. यावेळी चालक किरण पवार आणि वाहक रवी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गर्लगुंजी ग्रामपंचायत अध्यक्षा ललिता कोलकार, उपाध्यक्ष रेखा कुंभार, माजी चेअरमन गोपाळ पाटील, सूर्यकांत कुलकर्णी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments