एकीकडे सर्वत्र संक्रांतीचा उत्साह पाहायला मिळत असताना, बेळगाव शहरातील बुरुड कॉलनीतील रहिवाशांना मात्र नरकयातना सोसाव्या लागत आहेत. गेल्या काही दिवसांपासून येथील सांडपाण्याची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून संपूर्ण वस्तीला घाणीच्या पाण्याचा वेढा पडला आहे.

नेहरू नगर परिसरातील बुरुड कॉलनीमधील ड्रेनेज लाईन पूर्णपणे तुंबली असून सांडपाणी रस्त्यावरून थेट लोकांच्या घरात शिरत आहे. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांना श्वास घेणेही कठीण झाले आहे. या दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली असून, लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याबाबत रहिवाशांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे. आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
आज संक्रांतीचा मोठा सण असूनही या भागातील गरीब कुटुंबांना सण साजरा करता आलेला नाही. घरामध्ये मैलापाणी साचलेले असताना आम्ही सण साजरा तरी कसा करायचा, देवासमोर दिवा लावायलाही जागा उरलेली नाही, अशा शब्दांत रहिवाशांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या गंभीर समस्येबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना वारंवार विनंती करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. संबंधित विभागाचे अधिकारी केवळ एकमेकांकडे जबाबदारी ढकलत असून आमची दखल घ्यायला कोणाकडेच वेळ नाही, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. ही गरिबांची वस्ती असल्यानेच आमच्यावर ही वेळ आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या या आडमुठ्या धोरणाचा निषेध करण्यासाठी बुरुड कॉलनीतील रहिवाशांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या सोमवारी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असून, ही समस्या त्वरित न सुटल्यास तीव्र लढा देण्याचा इशारा वस्तीतील महिला व तरुणांनी दिला आहे.


Recent Comments