Bagalkot

बागलकोटमध्ये संक्रांतीचा उत्साह महिलांनी धरला सुगीच्या गाण्यांवर ठेका

Share

बागलकोट जिल्ह्यामध्ये संक्रांतीचा उत्साह शिगेला पोहोचला असून जिल्हावासीयांनी मोठ्या थाटामाटात सुगीच्या सणाचे स्वागत केले आहे. बागलकोटमधील नवनगर येथील रहिवासी शिक्षिका प्रिया कट्टी यांच्या निवासस्थानी महिलांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी महिलांनी पारंपरिक इळकली साड्या परिधान करून संक्रांतीच्या सुगीच्या गाण्यांवर ठेका धरला. महिलांनी भूमी मातेची विशेष पूजा केली असून यंदा पीक पाणी चांगले येऊन शेतकऱ्यांचे जीवन सुखी व्हावे, अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.

मुधोळ तालुक्यातील जालीबेरी गावात लोककलेच्या माध्यमातून संक्रांतीचा सण अर्थपूर्ण पद्धतीने साजरा झाला. कन्नड लोककला परिषदेच्या महिला विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमात ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडले. लोप पावत चाललेल्या लोककला जिवंत ठेवण्यासाठी यावेळी शोभना पदे, भजन आणि संक्रांतीची गाणी सादर करण्यात आली अशी प्रतिक्रिया आयोजकांनी दिली.

जिल्ह्यात सर्वत्र तिळगुळ वाटून शुभेच्छांची देवाणघेवाण करण्यात आली. आधुनिकतेच्या काळातही लोकगीते आणि पारंपरिक प्रथांच्या माध्यमातून संक्रांत साजरी करून बागलकोटच्या जनतेने आपली संस्कृती जपली आहे. प्रामुख्याने शेतकरी कुटुंबांमध्ये भूमीपूजन करून समृद्धीच्या आशेने हा सण साजरा केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Tags: