Kagawad

कागवाड तालुक्यातील ऐनापूरमध्ये दिमाखदार श्वान प्रदर्शन संपन्न

Share

कागवाड तालुक्यातील ऐनापूर येथे श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आयोजित १३ व्या भव्य श्वान प्रदर्शन कार्यक्रमात कोल्हापूरचे श्वान तज्ज्ञ आणि ‘टाईम्स फाउंडेशन पेट्सबॉल’चे प्रमुख अभिजीत शिंदे यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली आहे.

रस्त्यावरील कुत्र्यांना अन्न देऊ नये या नियमामुळे भुकेलेली जनावरे हिंसक होऊन नागरिकांना चावा घेऊ शकतात, अशावेळी याला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रदर्शनात सीमाभागातील ७० हून अधिक विविध प्रजातींच्या श्वानांनी सहभाग नोंदवला असून, यामध्ये विदेशी जातींसह देशी मुधोळ कुत्र्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी उत्कृष्ट संगोपन केलेल्या श्वान मालकांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आल्याची माहिती उदय बाळीकाई यांनी दिली.

श्वान प्रदर्शन विभागाचे उदय बाळिकाई यांनी माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागातून ७० हून अधिक श्वान मालक येथे आले होते. या उपक्रमामुळे नागरिकांना आणि शाळकरी विद्यार्थ्यांना विविध जातींचे श्वान जवळून पाहता आले. यात्रा कमिटीने राबवलेला हा उपक्रम आदर्शवत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रदर्शनाचे उद्घाटन ऐनापूरमधील ज्येष्ठ नागरिक दादा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी दादा जंतेन्नावर, नगरपंचायत सदस्य राजेंद्र पोतदार, अरुण गाणीगेर, तम्मण्णा पारशेट्टी, कुमार अपराज, संतोष पाटील, निखिल महाजन, राजू खवठकोप्प, राघवेंद्र कांबळे, रमेश दोडमणी, सदाशिव कागली यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रदर्शनात जर्मन शेफर्ड, लॅब्राडोर, गोल्डन रिट्रीव्हर, पग, रॉटविलर, डोबरमन, बॉक्सर, डाल्मेशियन, पॉमेरियन आणि सायबेरियन हस्की यांसारख्या विदेशी जातींसह देशी ‘मुधोळ’ जातीच्या कुत्र्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

विजेत्या श्वानांना रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यात प्रथम पारितोषिक १० हजार रुपये विकास पंड्रे, द्वितीय ७ हजार रुपये गुंडू केंपवाडी, तृतीय ५ हजार रुपये समेत पाटील आणि चतुर्थ ३ हजार रुपये कमलेश डुग्गनवर यांच्याकडून देण्यात आले. तसेच शिवानंद मडीवाळर आणि राजू अपराज यांनी विशेष बक्षिसे दिल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: