Belagavi

बेळगाव ग्रामीण क्षेत्रातील अंगणवाडी सेविका व सहाय्यिकांना नियुक्ती पत्रांचे वाटप

Share

पालक मोठ्या विश्वासाने आणि स्वप्नांनी आपल्या पाल्याला अंगणवाडीत पाठवतात. त्यामुळे अंगणवाडीत मुलांच्या आरोग्य आणि शिक्षणाकडे विशेष लक्ष देऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधला पाहिजे, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.

बेळगाव येथील जनसंपर्क कार्यालयात बुधवारी बेळगाव ग्रामीण क्षेत्रातील अंगणवाडी सेविका आणि सहाय्यिकांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी २ सेविका आणि २० सहाय्यिकांना आदेश पत्रे सुपूर्द करण्यात आली. अंगणवाडी पदांसाठी आता उच्चशिक्षित उमेदवार नियुक्त होत आहेत. आज सरकारी अंगणवाड्या खासगी शाळांशी स्पर्धा करत असून तेथे सर्व सुविधा दिल्या जात आहेत, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करावे अशी सूचना त्यांनी केली.

अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे. मुलांना विविध उपक्रमांमध्ये गुंतवून हसत-खेळत शिक्षण द्यावे. मुलांना कोणतीही शिक्षा करू नका. आपले मूल अंगणवाडीत सुरक्षित आहे, अशी भावना पालकांच्या मनात निर्माण होईल याची काळजी घ्या, असे मंत्री महोदयांनी म्हटले.

यावेळी महिला व बालविकास विभागाचे जिल्हा उपसंचालक चेतनकुमार, बेळगाव ग्रामीण बालविकास प्रकल्प अधिकारी सुमित्रा, तालुका पंचायत माजी अध्यक्ष शंकरगौडा पाटील उपस्थित होते.

Tags: