hubbali

कुंदगोळमध्ये १० वीच्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या

Share

धारवाड जिल्ह्यातील कुंदगोळ शहरात एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची त्याच्याच मित्रांनी चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लिंगराज असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक गुंजन आर्या यांनी घटनास्थळाला भेट देऊन प्राथमिक माहिती घेतली.

कुंदगोळ शहरातील सोसायटीच्या पाठीमागे लिंगराज आणि त्याच्या मित्रांमध्ये आज संध्याकाळी क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या मित्रांनी लिंगराजच्या गळ्यावर व पाठीवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात प्रचंड रक्तस्राव झाल्याने लिंगराजचा जागीच मृत्यू झाला. लिंगराज रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहताच त्याचे मित्र तिथून पसार झाले.

हत्येमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, आरोपींना अटक केल्यानंतरच खरा प्रकार समोर येईल असे पोलिसांनी म्हटले आहे. लिंगराजच्या वडिलांनी तीन जणांविरुद्ध तक्रार दाखल केली असून, त्यानुसार तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक गुंजन आर्या यांनी दिली आहे.

दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची अशा प्रकारे हत्या झाल्याने कुंदगोळ तालुक्यातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. इतक्या लहान वयात मुलांची मानसिकता हत्येपर्यंत जात असल्याबद्दल चिंता व्यक्त होत आहे. कुंदगोळ पोलीस सध्या फरार आरोपींच्या शोधासाठी विविध पथके तैनात करून तपास करत आहेत.

Tags: