Belagavi

कठोर परिश्रमातूनच यशाचे शिखर गाठता येते; के. एम. जानकी

Share

बेळगावमधील नामांकित केएलई संस्थेच्या राजा लखमगौडा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात २०२५-२६ शैक्षणिक वर्षाचा निरोप समारंभ आणि पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यावेळी विभागीय आयुक्त के. एम. जानकी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कठोर परिश्रम आणि ध्येयवादाचे महत्त्व पटवून दिले.

मुख्य अतिथी म्हणून बोलताना विभागीय आयुक्त म्हणाल्या की, प्रत्येकाने स्वतःचे आत्मपरीक्षण करून आपल्यातील गुणदोषांची जाणीव करून घेणे आवश्यक आहे. कठोर परिश्रम, सततचा सराव आणि थोर व्यक्तींचे मार्गदर्शन हीच यशाची त्रिसूत्री आहे. जपानसारख्या देशाची प्रगती तिथल्या तरुणांच्या राष्ट्रप्रेमामुळे झाली आहे. त्याचप्रमाणे भारतीय तरुणांनी देशाला सांस्कृतिक, तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या जगात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य विश्वनाथ सी. कामगोळ यांनी कॉलेजच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आरुषी पाटील आणि प्रीतम भांदुर्ग यांची ‘आदर्श विद्यार्थी’ म्हणून निवड करण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू देवण बामन (स्केटिंग) आणि लता जंगटी (डॉजबॉल) यांच्यासह राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेल्या ३२ विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. एस. ए. जवळी, क्रीडा समन्वयक विनायक हुक्केरी आणि सांस्कृतिक समन्वयक श्रीदेवी मडीवाळर उपस्थित होते. रोहिणी गुडी यांनी स्वागत केले, तर सुजाता के. यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सदानंद धवळेश्वर यांनी आभार मानले. आरुषी पाटील आणि हेमंत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या सोहळ्याला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते असे त्यांनी सांगितले.

Tags: