Belagavi

बेळगावात नॅशनल युथ डे उत्साहात साजरा

Share

बेळगावातील महांतेशनगर येथील एमिनेंट कोचिंग क्लासेसमध्ये स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मंजुनाथ कौलगी होते. त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून अभिवादन केले.

एखाद्या देशाचा विकास त्या देशाच्या तरुणांवर अवलंबून असतो, असे मत मंजुनाथ कौलगी यांनी व्यक्त केले. रवींद्रनाथ टागोरांच्या विधानाचा संदर्भ देत ते म्हणाले की, जर आपल्याला भारत समजून घ्यायचा असेल, तर स्वामी विवेकानंदांचे विचार वाचले पाहिजेत. स्वामीजींचे विचार तरुणांसाठी आजही प्रेरणादायी असून त्यांनी ‘उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका’ हा दिलेला संदेश जागतिक स्तरावर अजरामर असल्याचे त्यांनी नमूद केले.

स्वामी विवेकानंदांचे बेळगावशी असलेले नाते अविस्मरणीय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेला जाण्यापूर्वी स्वामीजींनी बेळगावात १० दिवस वास्तव्य केले होते, ही शहरासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे कौलगी म्हणाले. विद्यार्थ्यांनी आतापासूनच विवेकानंदांचे आदर्श आपल्या जीवनात अंगीकारले पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाची सुरुवात पवित्र पाटील यांच्या प्रार्थना गीताने झाली, तर प्रास्ताविक कमला गोरगुद्दी यांनी केले. यावेळी एमिनेंट कोचिंग क्लासेसच्या प्रधान सचिव भाग्यलक्ष्मी कौलगी, प्रशासकीय अधिकारी सदानंद बन्नूर आणि ज्येष्ठ शिक्षक सदाशिव सोरगावी उपस्थित होते. चन्नवीरय्या पुराणिकमठ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर संजीव दावणे यांनी आभार मानले.

Tags: