बागलकोट जिल्ह्यातील कुडलसंगम येथे आयोजित एकोणचाळिसाव्या शरण मेळाव्यात बसव धर्म विचारवंत डॉ. जे. एस. पाटील यांनी लिंगायत धर्माच्या आचरणाबाबत अत्यंत टोकदार भूमिका मांडली. कपाळावर कुंकू लावणारे लिंगायत नसून केवळ विभूती धारण करणारेच खरे लिंगायत असल्याचे सांगत त्यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

या विधानामुळे धार्मिक आणि सामाजिक वर्तुळात आता मोठी चर्चा सुरू झाली आहे. कुडलसंगम येथील मुख्य व्यासपीठावरून बोलताना डॉ. पाटील यांनी लिंगायत धर्माच्या अस्मितेवर भाष्य करतानाच कण्णेरी श्रींच्या विधानाचा कडाडून विरोध केला. एखाद्या लिंगायत स्वामीजींनी जेव्हा गणपती पूजा किंवा मिरवणुकीला विरोध केला, तेव्हा वैदिक प्रसारमाध्यमांनी त्याचा चुकीच्या पद्धतीने प्रचार केल्याचा आरोप त्यांनी केला. वचन साहित्याचा आधार घेत गणपती पूजा लिंगायत धर्मात ग्राह्य धरली जात नाही, असे सांगत आपल्या मठाधीशांनी स्वधर्माचा प्रचार करू नये का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बाभळेश्वर येथील एका कार्यक्रमात कण्णेरी श्रींनी बसव तत्त्वाच्या प्रचारकांना गावांत घेऊ नका, असे म्हटले होते; त्याचा समाचार घेताना अशा कुंकूधारी स्वामींना जनतेनेच धडा शिकवावा, असे त्यांनी म्हटले.
लिंगायतांनी हिंदू धर्मातील प्रथा आणि परंपरा पूर्णपणे सोडल्याशिवाय ते खरे लिंगायत होऊ शकत नाहीत, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. मंदिरांमध्ये जाणे किंवा तीर्थस्नान करणे हे बसव तत्त्वांच्या विरोधात असल्याचे सांगून लिंगायत समाजाने मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडावे, असे त्यांनी म्हटले. लिंगायत धर्माच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. डॉ. पाटील यांच्या या विधानांमुळे बसव अनुयायांमध्ये आणि धार्मिक क्षेत्रात आता वादाला तोंड फुटले आहे.


Recent Comments