Belagavi

महापौर मंगेश पवार आणि जयंत जाधव यांची अपात्रता हायकोर्टाचा दिलासा

Share

बेळगावमधील प्रसिद्ध ‘खाऊ कट्टा’ गाळे वाटपात अधिकाराचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली अपात्र ठरवण्यात आलेले महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांची अपात्रता रद्द ठरवल्याने या दोन्ही नेत्यांना आपले पद पुन्हा मिळाले आहे.

२०२० मधील लिलाव प्रक्रियेवेळी हे दोन्ही नेते नगरसेवक नव्हते आणि गाळ्यांचे वाटप नियमानुसारच झाले आहे, हा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. कर्नाटक महानगरपालिका कायद्यांतर्गत त्यांना अपात्र ठरवण्याचा आदेश न्यायालयाने पूर्णपणे फेटाळून लावला आहे. राजकीय हेतूने प्रेरित होऊन केलेल्या आरोपांना या निकालाने चपराक बसली असून सत्याचा विजय झाला असल्याचे बोलले जात आहे.

या संपूर्ण प्रकरणात बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी दिलेला लढा यशस्वी ठरला आहे. हा केवळ राजकीय द्वेषातून केलेला प्रयत्न असल्याचे सांगत पाटील यांनी सुरुवातीपासूनच न्यायालयीन लढाईवर विश्वास व्यक्त केला होता. राजकीय दबावाचा सामना करत आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याने पवार आणि जाधव यांच्या राजकीय कारकिर्दीला या निकालामुळे बळ मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Tags: