विश्वेश्वरैया नगरमधील बेपत्ता तरुणीचा अवघ्या २४ तासांत शोध घेऊन तिला सुरक्षितपणे कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले. एपीएमसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक उस्मान आवटी आणि त्यांच्या पथकाने दाखवलेल्या या तत्परतेबद्दल रहिवाशांनी त्यांचा सत्कार केला.

रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी तरुणी बंगळुरूला गेल्याचे शोधून काढले. ती तिथे एका निवासस्थानी (पीजी) असल्याची खात्री पटताच आवटी यांनी तातडीने कुटुंबाला माहिती दिली. विशेष म्हणजे, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचे पाहून त्यांनी स्वखर्चाने वाहनाची व्यवस्था केली आणि तरुणीला सुरक्षितपणे बेळगावला आणले. पोलिसांच्या या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
माजी महापौर विजय मोरे यांनी यावेळी पोलिसांच्या कामगिरीचा गौरव केला. तरुणीकडे मोबाईल नसतानाही पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तिचा शोध लावला, असे त्यांनी म्हटले. या सोहळ्याला आलन मोरे, के. वाय. रवींद्र, चंद्रशेखर, दयानंद कदम, अवधूत तुडयेकर यांच्यासह विश्वेश्वरैया नगरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments