Vijayapura

सिद्धरामय्या हे केवळ काँग्रेसचे नव्हे तर संपूर्ण राज्याचे मुख्यमंत्री : आम. यत्नाळ

Share

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या स्तुतीवरून सुरू असलेल्या वादावर भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी पडदा टाकला. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असून ते आपल्या मतदारसंघात आले असता त्यांचा आदर करणे ही आपली संस्कृती असल्याचे त्यांनी म्हटले.

आमदार यत्नाळ यांनी यावेळी स्वपक्षालाही सूचक इशारा दिला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जनतेने माझ्या समर्थनार्थ दिलेल्या घोषणा ही भाजप आणि काँग्रेस या दोघांसाठी धोक्याची घंटा असल्याचे त्यांनी म्हटले. जर माझ्यासारख्या किंवा प्रताप सिम्हा यांच्यासारख्या नेत्यांकडे दुर्लक्ष केले, तर त्याचे गंभीर परिणाम होतील, माझ्या या भूमिकेमुळे कोणाचे मन दुखावले असेल तर त्याला आपण काहीही करू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बळ्ळारी येथील वादावर भाष्य करताना यत्नाळ यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी लावून धरली. सध्याच्या एआय तंत्रज्ञानामुळे ऑडिओ आणि व्हिडिओ पुरावे बनावट असू शकतात, त्यामुळे राज्य सरकारच्या तपास यंत्रणा आपल्या कार्यकर्त्यांना क्लीन चिट देऊ शकतात, असा आरोप त्यांनी केला. प्रदेशाध्यक्ष निवडीबाबतचा निर्णय हायकमांड योग्य वेळी घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी स्थानिक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: