DEATH

चिमुकल्या बाळासह शहिद जवानाचे पत्नीने घेतले अंत्यदर्शन

Share

भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जवान प्रमोद जाधव सुटीवर आले असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. एका बाजूला पत्नीच्या बाळंतपणाची प्रतीक्षा असतानाच अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याने सातारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

साताऱ्यातील दरे गावचे रहिवासी असलेले प्रमोद परशुराम जाधव हे सिकंदराबाद येथे देशसेवा बजावत होते. घरी आई नसल्याने, गर्भवती पत्नीच्या बाळंतपणासाठी ते आठ दिवसांपूर्वीच रजेवर आले होते. मात्र, शनिवारी दुचाकीवरून जात असताना आयशर टेम्पोने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अत्यंत क्लेशदायक बाब म्हणजे, शनिवारी सकाळी प्रमोद यांचे पार्थिव गावात आणले जात असतानाच, रुग्णालयात त्यांच्या पत्नीने गोंडस मुलीला जन्म दिला. घरात पाळणा हालण्यापूर्वीच कुटुंबाचा आधारवड गेल्याने सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.

काही तासांच्या चिमुकलीला जेव्हा आपल्या वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले, तेव्हा उपस्थित जनसमुदायाला अश्रू अनावर झाले. ज्या वडिलांच्या हाताचा स्पर्श बाळाला मिळायला हवा होता, त्याच वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याने समाजमनातून दुःख व्यक्त होत आहे.

जवान प्रमोद जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच वेळी जन्म आणि मृत्यूचा हा अजब खेळ पाहून संपूर्ण जिल्हा शोकसागरात बुडाला आहे.

Tags: