Belagavi

किल्ले तलावात बुद्ध आणि केएलई चौकात शाहू स्मारकाची मागणी

Share

महापालिका सभेत ठराव मंजूर होऊन १० वर्षे उलटली तरी भगवान बुद्ध आणि राजर्षी शाहू महाराजांचे पुतळे बसवण्यात आलेले नाहीत. या दिरंगाईचा निषेध करत दलित संघर्ष समितीने महापालिकेसमोर तीव्र निदर्शने केली.

आज बेळगाव महानगरपालिकेसमोर दलित संघर्ष समितीच्या वतीने घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन करण्यात आले. २०१६ च्या महापालिका सर्वसाधारण सभेत किल्ले तलावात भगवान बुद्धांचा १०० फुटी पुतळा आणि केएलई चौकात राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा उभारण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला होता. या ठरावावर तत्कालीन पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि दिवंगत आमदार संभाजीराव पाटील यांच्यासह सर्व नगरसेवकांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. मात्र, दहा वर्षे होऊनही पुतळ्यांची प्रतिष्ठापना न झाल्याने महापुरुषांवर अन्याय होत असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

महानगरपालिकेने आजच्या सभेत चर्चा करून अंतिम निर्णय घ्यावा, अन्यथा २६ जानेवारीला ध्वजारोहण करू न देता काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करू, असा इशारा दलित संघर्ष समितीने दिला आहे.

निवेदन स्वीकारण्यासाठी आयुक्त कार्तिक एम. आले असता, प्रादेशिक आयुक्तांनीच यावे या मागणीसाठी आंदोलकांनी काही काळ गोंधळ घातला. त्यानंतर उत्तरचे आमदार आसिफ सेठ, महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी जोशी यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

यावेळी दलित संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: