Belagavi

बेळगाव महापालिकेत अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून गोंधळ

Share

बेळगाव महानगरपालिकेच्या सामान्य सभेत आज अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत नागरी समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले. प्रशासकीय कामातील दिरंगाई आणि अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे विकासकामे रखडल्याची टीका सदस्यांनी केली.

आज झालेल्या बैठकीत सत्ताधारी नेते हनुमंत कोंगाली, रवी धोत्रे आणि विरोधी पक्षनेते शाहीदखान पठाण यांनी अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली. जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करताना जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

मुदत संपलेल्या महापालिकेच्या मालमत्ता परत घेण्याबाबत रवी धोत्रे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. शहरात कचरा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी रेश्मा भैरकदार यांनी केली.

लेंडी नाल्यातील गाळ उपसण्याच्या मुद्द्यावरून गिरीश धोंगडी यांनी प्रशासनाला धारेवर धरले. लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांकडे अधिकारी गांभीर्याने पाहत नसल्याची टीका त्यांनी केली.

ई-प्रॉपर्टीच्या कामात एजंटांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप राजशेखर ढोणी यांनी केला. पालिकेच्या जागेवरील अतिक्रमणे हटवण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पार्किंगच्या निविदा काढण्यास होत असलेल्या विलंबाबाबतही इतर नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Tags: