पत्रकार हे समाजाचे चौथे आधारस्तंभ आहेत. त्यांनी नेहमी सत्य आणि वास्तववादी बातम्या प्रसिद्ध करून समाजाच्या उत्कर्षात मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी केले.

बेळगावच्या वार्ता भवन येथे मुद्रण पत्रकार संघातर्फे पुरस्कारविजेते गुरुराज जमखंडी, अमित उपाध्ये, संतोष चिनगुडी आणि संजीव कांबळे यांच्यासाठी अभिनंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार आसिफ सेठ आणि डीसीपी एन.व्ही. बरमणी यांनी पुरस्कारप्राप्त पत्रकारांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित गौरव केला.
आमदार आसिफ सेठ पुढे म्हणाले की, पत्रकार अनेक आव्हानांचा सामना करून आपले कर्तव्य बजावत असतात. काळाची गरज ओळखून त्यांनी आपल्या व्यावसायिक कौशल्यात बदल करायला हवा. मात्र, लोकांसाठी दिलेली माहिती ही समाजाच्या प्रगतीला पूरक आणि सत्यावर आधारित असावी.
यावेळी डीसीपी एन.व्ही. बरमणी यांनीही पत्रकारितेच्या पेशाचे कौतुक केले आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या सोहळ्याला अध्यक्ष विलास जोशी, कार्याध्यक्ष ऋषिकेश देसाई, उपाध्यक्ष श्रीशैल मठद, संजय सूर्यवंशी, सरचिटणीस नौशाद बिजापूर, सहसचिव सुरेश नेर्ली, खजिनदार रवी उप्पर, कायदेशीर सल्लागार रवींद्र तोटीगेर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments