Belagavi

बेळगावात रोटरी ‘अन्नोत्सव २०२६’ चा दिमाखदार प्रारंभ

Share

बेळगावातील खाद्यप्रेमी ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्या रोटरी ‘अन्नोत्सव २०२६’ चा शानदार प्रारंभ झाला आहे.

सांवगाव रोडवरील अंगडी कॉलेज मैदानावर आयोजित या महोत्सवात देशाच्या विविध भागांतील १२ पेक्षा जास्त स्टॉल्स असून, पहिल्याच दिवशी हजारो नागरिकांनी येथे हजेरी लावली.

रोटरी क्लब ऑफ बेळगावातर्फे आयोजित या अन्नोत्सवाचे उद्घाटन रोटरी प्रांतपाल अरुण भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले. १० दिवस चालणाऱ्या या महोत्सवात शाही मुघलाईपासून ते कोस्टल फिश करीपर्यंतच्या वैविध्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. या महोत्सवातून जमा होणारा निधी सार्वजनिक स्वच्छतागृहे, शाळांचे बांधकाम आणि इतर सामाजिक कार्यांसाठी वापरला जाणार असल्याची माहिती अरुण भंडारे यांनी दिली.

रोटरीचे अध्यक्ष विनायक नाईक यांनी सांगितले की, यंदा पर्यटकांसाठी १० हजार दुचाकी आणि २ हजार चारचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे. तसेच महोत्सवात दररोज ‘बॉलीवूड टू हॉलीवूड’ संगीत कार्यक्रम, अयोध्या बँड आणि विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन केले आहे. यावेळी उद्योजिका दीपा सिदनाळ यांनी रोटरीच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

यंदाच्या अन्नोत्सवात डिजिटल क्रांतीवर भर देण्यात आला असून क्यूआर कोडद्वारे ऑनलाईन तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. खाद्यपदार्थांसोबतच गृहपयोगी वस्तू, खेळणी आणि ऑटोमोबाईलचे स्टॉल्सही आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. शुक्रवारी पार पडलेल्या ‘ऋषारंग’ सुफी संगीत कार्यक्रमाने या महोत्सवाची रंगत अधिकच वाढवली.

Tags: