Belagavi

‘नरेगा’तून गांधीजींचे नाव हटवणे ही त्यांची दुसरी हत्याच

Share

मतचोरीच्या गंभीर आरोपांवर उत्तर देण्याऐवजी केंद्र सरकारने ‘नरेगा’ योजनेचे नाव बदलून देशाची दिशाभूल करण्याचे काम केले आहे. महात्मा गांधींचे नाव योजनेतून वगळणे ही त्यांची पुन्हा एकदा हत्या करण्यासारखेच आहे, असा गंभीर आरोप एआयसीसी सचिव गोपीनाथ यांनी केला

बेळगावच्या काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गोपीनाथ यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे नाव बदलून ‘व्हीबीजी रामजी’ असे करण्यात आले आहे. केवळ नाव बदलणे हा उद्देश नसून ही योजनाच पूर्णपणे मोडीत काढण्याचा हा डाव आहे. पंचायत स्तरावरील अधिकारांचे केंद्रिकरण करून ते दिल्लीच्या हातात सोपवण्यात आले आहे. सोनिया गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे, भाजप सरकारने पुन्हा एकदा गांधीजींच्या विचारांची हत्या केली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

या निर्णयाच्या निषेधार्थ ११ जानेवारी रोजी जिल्हास्तरावर लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. भाजप कार्यालयांना घेराव घालून निषेध नोंदवण्यात येईल, तसेच दोन दिवसांचे विशेष अधिवेशनही आयोजित करण्यात आले आहे. जॉब कार्डमधील गोंधळाचा मुद्दा आताच का उपस्थित केला जात आहे? असा सवाल करत त्यांनी मतचोरीच्या प्रकरणावरून लक्ष भरकटवण्यासाठी भाजप हे षडयंत्र रचत असल्याचे सांगितले.

यावेळी आंदोलनाच्या रूपरेषेचे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. या पत्रकार परिषदेला उत्तरचे आमदार आसिफ सेठ, विनय नावलगट्टी, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, काडा अध्यक्ष युवराज कदम, मृणाल हेब्बाळकर आणि इतर काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: