Belagavi

इनामदार साखर कारखाना दुर्घटना: दोषींवर कठोर कारवाईचा एसपींचा इशारा

Share

बैलहोंगल तालुक्यातील मरकुंबी येथील इनामदार साखर कारखान्यात झालेल्या बॉयलर दुर्घटनेप्रकरणी कोणाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे, याचा तांत्रिक अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली.

बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी या प्रकरणातील तपासाची दिशा स्पष्ट केली. पोलीस अधीक्षक रामराजन यांनी सांगितले की, कारखान्यात तांत्रिकदृष्ट्या कुशल कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती की नाही, याची कसून चौकशी केली जाईल. कारखान्यात ‘सुरक्षा व्यवस्थापक’ पदावर व्यक्तीची नियुक्ती केली आहे का? आणि केली असल्यास ती कधी झाली? याच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर सुरक्षा नियमांचे पालन झाले नसेल, तर कारखाना मालकांनाही या प्रकरणी जबाबदार धरले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

बॉयलरची वेळोवेळी तपासणी करण्याची आणि सुरक्षेची जबाबदारी ‘बॉयलर निरीक्षका’ची असते. जर त्यांनी कर्तव्यात कसूर केली असेल, तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. सध्या तांत्रिक अहवालाची प्रतीक्षा असून, तो प्राप्त झाल्यानंतरच अटकेची कारवाई केली जाईल; सध्या कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असेही एसपींनी स्पष्ट केले.

कामगारांना आवश्यक त्या सर्व सुरक्षा सुविधा पुरवणे ही कारखान्याची जबाबदारी आहे. सुविधा न पुरवल्यामुळे ही दुर्घटना घडली असेल, तर मालकांवर कारवाई होईल. मात्र, सर्व सुविधा असूनही केवळ मानवी चुकांमुळे किंवा निष्काळजीपणामुळे हे घडले असेल, तर सुरक्षा व्यवस्थापकासह घटनेला कारणीभूत असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षकांनी नमूद केले.

Tags: