Khanapur

खानापूर तहसीलदार कार्यालयात रात्रीच्या वेळी अवैध कामांचा सुळसुळाट

Share

खानापूर तहसीलदार कार्यालयात सर्व प्रकारचे बेकायदेशीर व्यवहार उघडपणे चालत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते सुरेशभाऊ जाधव यांनी केला आहे. भू-परिवर्तन, वाळू माफिया आणि खाण माफियांना प्रशासनाचे उघड पाठबळ मिळत असून, या गैरव्यवहारांवर स्थानिक आमदार मौन बाळगून असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

तालुका प्रशासकीय इमारतीमध्ये रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या संशयास्पद कामकाजावर त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. यापूर्वीचे तहसीलदार भू-माफियांच्या प्रकरणामुळे निलंबित झाले होते, तरीही विद्यमान परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही, असे त्यांनी म्हटले. मल्टिप्लेक्स, खाणकाम आणि वाळू उपसा अशा बेकायदेशीर कामांमध्ये लाखो रुपयांचे कमिशन राज सुरू असून, सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे मात्र पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे, अशी टीका त्यांनी केली.

स्थानिक कंत्राटदारांना कामे देण्याचे आश्वासन देऊन आता बाहेरील लोकांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. याशिवाय, निवडणुकीपूर्वी वाळू वाहतुकीबाबत दिलेली आश्वासने हवेत विरली असून, आता गरिबांवरच गुन्हे दाखल केले जात आहेत. बीडीसीसी बँक निवडणुकीच्या वेळी जाहीर करण्यात आलेला २५ लाखांचा निधी अद्यापही खर्च झालेला नाही. या सर्व गैरव्यवहारांवर प्रशासनाने उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

Tags: