Kittur

कित्तूरमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Share

कित्तूर तालुक्यातील तुरकरकीगीहळ्ळी गावात माहेरी जाण्याच्या वादातून पतीने पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी घडली असून, यामुळे कंबळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

यल्लव्वा शिवप्पा कंबळी (४३) असे मृत महिलेचे नाव असून, शिवप्पा सण्णबसप्पा कंबळी (५२) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यल्लव्वा यांच्या आईचे गेल्या आठवड्यात निधन झाले होते. आईच्या निधनामुळे त्या दुःखात होत्या. शुक्रवारी त्यांनी स्वयंपाक करून माहेरी जाण्याची तयारी केली होती, मात्र पती शिवप्पा यांचा याला विरोध होता. याच कारणावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला. रागाच्या भरात शिवप्पाने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला केला, ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू झाल्याचे पाहून शिवप्पानेही घरातच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

दोन्ही मुलांनी आणि स्थानिकांनी घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता ही घटना उघडकीस आली. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये आधीपासूनच छोटे-मोठे वाद होत असत. मृत शिवप्पा हा गवंडी काम करत होता. आईच्या निधनानंतर माहेरी जाण्यासाठी निघालेल्या यल्लव्वा यांचा अशा प्रकारे अंत झाल्याने गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत. या दाम्पत्याला दोन मुले असून ती कारखान्यात कामाला आहेत.

घटनेची माहिती मिळताच कित्तूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बेळगाव येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी कित्तूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Tags: