बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील हिप्परगी बॅरेजचा २२ क्रमांकाचा दरवाजा ६ जानेवारी रोजी तुटल्यामुळे गेल्या ४८ तासांत कृष्णा नदीच्या पाणीपातळीत सुमारे १० फुटांची मोठी घट झाली आहे. दरवाजातून सातत्याने पाणी गळती सुरू असल्याने नदी पूर्णपणे कोरडी पडण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

बॅरेजच्या दरवाजाची तातडीने दुरुस्ती न झाल्यास अवघ्या एक दिवसात नदीचे पात्र पूर्णपणे शुष्क होण्याची भीती व्यक्त होत आहे. आतापर्यंत १ टीएमसीहून अधिक पाणी वाहून गेल्याने शेतकरी आणि सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यामुळे चिकोडी तालुक्यातील कृष्णा नदीकाठच्या यडूर, कल्लोळ, मांजरी, अंकली, चांदूर, इंगळी या गावांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा आणि हजारो एकरवरील पिकांचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.
४८ तासांत पाणीपातळी १० फुटांनी खाली गेल्याने नदीकाठचे गावकरी हवालदिल झाले आहेत. बॅरेजचा दरवाजा लवकर दुरुस्त न झाल्यास कल्लोळ गावाजवळ कृष्णा नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडू शकते. सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेऊन चिकोडी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच निर्माण झालेल्या या संकटामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. सिंचन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज आहे.


Recent Comments