Uncategorized

विजापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध

Share

विजापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि मंत्रिमंडळातील सदस्यांनी जिल्हा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विविध विकासकामांना गती देत भव्य व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याच्या विकासाबाबत आपली भूमिका स्पष्ट करत विविध आश्वासने दिली.

ऐतिहासिक विजापूर शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकासमोर बसवण्यात आलेल्या वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण केले. पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित जनसमुदायाला अभिवादन केले. याच कार्यक्रमात विजापूर मध्यवर्ती बसस्थानकाचे ‘कित्तूर राणी चन्नम्मा बसस्थानक’ असे नामकरण करण्यात आले असून त्याच्या नामफलकाचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी केले. त्यानंतर भूतनाथ गावातील सायकलिंग वेलोड्रोमचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, मंत्री एम. बी. पाटील, शिवानंद पाटील, डॉ. एच. सी. महादेवप्पा, लक्ष्मी हेब्बाळकर, भैरती सुरेश आणि आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ उपस्थित होते.

दरबार हायस्कूलच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी मुख्यमंत्र्यांनी रिमोटद्वारे केली. यावेळी मुख्यमंत्र्यांना कित्तूर राणी चन्नम्मा यांची चांदीची मूर्ती भेट देण्यात आली. प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री पदावर राहण्याचा विक्रम केल्याबद्दल जिल्हावासियांच्या वतीने आणि पंचमसाली समाजाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंत्री शिवानंद पाटील यांनी विजापूर जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आणि आगामी अर्थसंकल्पात या महाविद्यालयाच्या कामासाठी पूर्ण निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली.

कार्यक्रमात बोलताना मंत्री एम. बी. पाटील यांनी विजापूर हे कित्तूर राणी चन्नम्मा यांचे माहेर असल्याचे सांगत जिल्ह्याच्या विकासातील महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले. आमदार बसणगौडा पाटील यत्नाळ यांनी शहरात १६० कोटी रुपये खर्चाचा उड्डाणपूल निर्माण करण्यासाठी निधी देण्याची मागणी केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी विजापूरच्या लिंबू पिकाचे महत्त्व आणि कृष्णा अप्पर प्रवाही योजनेच्या तिसऱ्या टप्प्याबाबत भाष्य केले. या प्रकल्पासाठी इतर राज्यांकडून अडथळे येत असले तरी, सर्व आव्हाने पेलून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

विजापूर शहरात पार पडलेल्या या अभूतपूर्व कार्यक्रमाला मंत्री रामलिंगा रेड्डी, डॉ. एम. बी. पाटील, शिवानंद पाटील, भैरती सुरेश, डॉ. एच. सी. महादेवप्पा, लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार बसणनगौडा पाटील यत्नाळ, सी. एस. नाडगौडा, यशवंतरावगौडा पाटील, विठ्ठल कटकधोंड, अशोक मनगुळी, राजूगौडा पाटील आणि पंचमसाली समाजाचे नेते उमेश कोळकूर, राजू तोरवी, विद्याराणी तुंगळ यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: