हुबळी येथे महिलेला विवस्त्र केल्याच्या अमानवीय घटनेचे आज बेळगावमध्ये तीव्र पडसाद उमटले. भाजपच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

माजी मंत्री शशिकला जोल्ले आणि माजी आमदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करून पीडितेला न्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी बोलताना माजी आमदार संजय पाटील यांनी राज्य सरकारवर कडक शब्दांत टीका केली. गेल्या अडीच वर्षांच्या काळात काँग्रेसने भ्रष्टाचाराचे सर्व उच्चांक गाठले असून अंतर्गत वादात सरकारचे जनतेच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी सांगितले. हुबळीतील संतापजनक घटनेमुळे राज्याची मान खाली गेली असून सुजाता हंडे यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. तसेच बेळगाव सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचत त्यांनी सरकारच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली.
या आंदोलनात भाजप शहराध्यक्षा गीता सुतार, माजी आमदार अरविंद पाटील, उज्वला बडवण्णाचे, लीना टोपन्नवर, डॉ. सोनाली सरनोबत, शिल्पा केकरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, मुरुगेंद्रगौडा पाटील आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments