Kagawad

कागवाड तालुका सराफ आणि सुवर्ण व्यापारी संघटनेची बैठक

Share

कागवाड येथे पार पडलेल्या सराफ आणि सुवर्ण व्यापारी संघटनेच्या वार्षिक बैठकीत वाढत्या सोन्या -चांदीच्या दरामुळे व्यवसायावर होणाऱ्या परिणामाच्या गंभीर परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी बोलताना संघटनेचे अध्यक्ष सचिन पोतदार यांनी सांगितले की, देशात सोने-चांदीचे दर वर्षभरात दुप्पट झाल्याने सुवर्ण कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. लग्नसराईत होणारी मोठी खरेदी आता दरवाढीमुळे पूर्णपणे थंडावली असून ग्रामीण भागातील व्यवसाय कसा टिकवायचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, या संकटातून बाहेर पडण्यासाठी शेतकरी कुटुंबांचा विश्वास संपादन करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया विनोद पोतदार आणि कमलाकर पोतदार यांनी व्यक्त केली.

या बैठकीत व्यापाऱ्यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले. भाव वाढल्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, तपासणीच्या नावाखाली काही पोलीस कर्मचारी ग्रामीण भागातील सुवर्ण कारागिरांना नाहक त्रास देत असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. अशा प्रकारचा त्रास थांबवण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या वार्षिक बैठकीत हनुमंत माने, प्रशांत यादव, संभाजी देशमुख, दिवाकर पोतदार, नारायण पोतदार, संजय पोतदार, उत्तम सलगर यांच्यासह संघटनेचे अनेक सदस्य उपस्थित होते.

Tags: