पंजाबमधील लुधियाना येथे सुरू असलेल्या ६९ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत बेळगावच्या ‘डीवायईएस’ क्रीडा वसतिगृहातील १२ वर्षीय विद्यार्थिनी कावेरी सूर्यवंशी हिने ज्युडो स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे.


३२ किलो वजनी गटात कर्नाटकचे प्रतिनिधित्व करताना कावेरीने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये तेलंगणा आणि जम्मू-काश्मीरच्या स्पर्धकांना ‘इप्पोन’ तंत्राचा प्रभावी वापर करून पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीत हरियाणाच्या खेळाडूविरुद्ध कावेरीला अल्प फरकाने पराभव स्वीकारावा लागला. मात्र, त्यानंतर झालेल्या ‘रिपचेज’ फेरीत तिने पंजाबच्या खेळाडूला आणि कांस्य पदकासाठी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात दिल्लीच्या भाग्य नावाच्या खेळाडूला धूळ चारून पदकावर आपले नाव कोरले.
बेळगावच्या जिल्हा क्रीडांगणावर एन.आय.एस. प्रशिक्षिका रोहिणी पाटील आणि कुतुजा मुलतानी यांच्या मार्गदर्शनाखाली कावेरी सराव करत आहे. या यशासाठी तिला उपसंचालक श्रीनिवास बी. यांचे निरंतर प्रोत्साहन लाभले असून, तळागाळातील क्रीडा प्रशिक्षणाच्या यशाची ही पोचपावती असल्याचे कावेरी सूर्यवंशी हिने म्हटले आहे. कावेरीच्या या कामगिरीने बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण कर्नाटकच्या ज्युडो क्षेत्रात तिचे कौतुक होत आहे.


Recent Comments