Belagavi

इनामदार साखर कारखाना बॉयलर स्फोट : मृतांचा आकडा ८ वर

Share

बैलहोंगल तालुक्यातील मुरकुंबी येथील इनामदार साखर कारखान्यात झालेल्या बॉयलर स्फोटातील मृतांची संख्या आज आठवर पोहोचली आहे. बेळगावच्या केएलई डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आणखी एका कामगाराचा मृत्यू झाला असून, यामुळे या भीषण दुर्घटनेची तीव्रता अधिकच वाढली आहे.

गोकाक तालुक्यातील गिळीहसूर गावातील राघवेन्द्र मल्लप्पा गिरियाल असे मृताचे नाव असून, आज त्यांची प्राणज्योत मालवली. रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या राघवेन्द्र यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मृत राघवेन्द्र हे कारखान्यात मेकॅनिकल विभागात कार्यरत होते. स्फोटाच्या दिवशी गंभीर भाजल्यामुळे त्यांना तातडीने बेळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, जखमा खोल असल्याने उपचारांना यश आले नाही आणि आज त्यांचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेनंतर साखर कारखाना प्रशासनाने मृताच्या कुटुंबाला १५ लाख रुपयांची तातडीची मदत देऊ केली आहे. मात्र, केवळ पैशांनी कुटुंबाचे भविष्य सावरले जाणार नाही, अशी प्रतिक्रिया मृताचे नातेवाईक विनायक यांनी व्यक्त केली आहे. मृत राघवेन्द्र यांच्या भावाला कारखान्यात कायमस्वरूपी नोकरी द्यावी आणि कुटुंबाला पूर्ण न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी विनायक यांनी केली आहे.

Tags: