प्रेमीयुगुलांचा विवाह लावणाऱ्या ‘भीम सेने’वरील आरोप खोटे असून बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच विवाहित जोडप्याला तातडीने पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण मादर यांनी केली आहे.

धारवाड जिल्ह्यातील नवलगुंद येथील बसवराज नडविनमनी आणि एका तरुणीने २ जानेवारी २०२६ रोजी बेळगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात स्वमर्जीने विवाह केला. या विवाहात ‘युवा कर्नाटक भीम सेना युवा शक्ती’ संघटनेने कायदेशीर मदत केली होती. मात्र, या विवाहावरून संघटनेवर आणि सदस्यांवर खोटे आरोप केले जात असल्याप्रकरणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण मादर यांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, संबंधित तरुण आणि तरुणीचे गेल्या ३ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मुलीच्या घरच्यांचा या विवाहाला विरोध असल्याने या जोडप्याने संघटनेकडे मदतीची मागणी केली होती. संघटनेने सर्व कागदपत्रांची पूर्तता करून उपनिबंधक कार्यालयात त्यांच्या विवाहाची नोंदणी केली. असे असतानाही, निगप्पा एम. केळगेरी नावाच्या व्यक्तीने ‘दलिता संघर्ष समिती’च्या लेटरहेडचा वापर करून संघटनेवर आणि जोडप्यावर खोटे आरोप केले आहेत. आपल्या जीवाला धोका असून आपल्याला संरक्षण मिळावे अशी मागणी या जोडप्याने केली आहे.
या आरोपांमुळे संघटनेची सामाजिक प्रतिष्ठा मलीन झाली असून, जोडप्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी प्रवीण मादर यांनी बेळगाव उत्तर विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांना निवेदन देऊन निगप्पा केळगेरी यांच्यावर बीएनएस २०२३ च्या विविध कलमान्वये कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, संबंधित जोडप्याला आणि त्यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
याप्रसंगी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अन्वय के.आर., राज्य संयोजक शिवानंद तलवार, जिल्हाध्यक्ष सचिन कोलकार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते


Recent Comments