बागलकोट जिल्ह्यातील हिप्परगी बंधाऱ्याचे २२ क्रमांकाचे क्रस्ट गेट तुटल्याने गेल्या चार दिवसांपासून पाण्याची मोठी नासाडी होत आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे सुमारे ३.५ टीएमसी पाणी वाहून गेल्याने आगामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बागलकोट जिल्ह्यातील रबनकवी-बनहट्टी तालुक्यातील हिप्परगी बंधाऱ्याचे २२ वे क्रस्ट गेट पाण्याचा प्रचंड दाब सहन न झाल्याने तुटले आहे. ही घटना घडून चार दिवस उलटले तरी अद्याप दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. दुरुस्तीचे काम संथ गतीने सुरू असल्याने शेतकरी आणि स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. घटनास्थळी तहसीलदार आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी तळ ठोकून आहेत, मात्र आतापर्यंत केवळ एक प्लेट बसवण्यात यश आले आहे.
उर्वरित प्लेट्स बसवताना अनेक तांत्रिक अडचणी येत असून, आपत्कालीन गेट बसवण्यासाठी कामगार आणि अधिकारी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले काम थांबवून आज सकाळी पुन्हा सुरू करण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे ६ टीएमसी क्षमता असलेल्या या बंधाऱ्यात आता केवळ २.५ टीएमसी पाणी शिल्लक राहिले आहे. अधिकाऱ्यांच्या या कार्यपद्धतीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
उन्हाळ्याच्या तोंडावर इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अधिकारी आणि संबंधित पालकमंत्र्यांच्या दुर्लक्षामुळेच ही परिस्थिती ओढवली असल्याचे संतप्त शेतकऱ्यांनी म्हटले आहे. तसेच, युद्धपातळीवर दुरुस्ती पूर्ण करून पाण्याची नासाडी थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


Recent Comments