बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील कंकणवाडी गावाजवळ कृष्णा नदीच्या पात्रात ऊस वाहतूक करणारी नौका फुटल्याने ट्रॅक्टर नदीत बुडाल्याची भीषण घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.


कंकणवाडी बेटावरून सुमारे १० टन ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर दोन नौकांच्या साहाय्याने नदी पार करत होता. मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास अचानक नौकेचे दोन तुकडे झाल्याने ऊसाने भरलेला ट्रॅक्टर नदीत कोसळला. ट्रॅक्टर चालक आणि त्यावरील कामगारांनी प्रसंगावधान राखत नदीत उड्या मारल्या आणि पोहून काठ गाठल्याने मोठा अनर्थ टळला. सध्या नदीत बुडालेला ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेमुळे कंकणवाडीतील शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बेटावरील लोकांसाठी कायमस्वरूपी पूल किंवा वाहतुकीची योग्य सोय करण्याची मागणी अनेक दशकांपासून केली जात आहे, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी म्हटले. उत्तर कर्नाटकच्या भागाबाबत सरकार सापत्नभावाची वागणूक देत असल्याची टीका शेतकऱ्यांनी केली आहे. अद्याप सहा हजार टन ऊसाची वाहतूक बाकी असून सरकारने तात्काळ पर्यायी नौकेची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


Recent Comments