बेळगाव शहरातील शांतीनगर आणि चिदंबर नगर भागात घरफोड्या करणाऱ्या तेलंगणा येथील एका आंतरराज्य चोराला अटक करण्यात टिळकवाडी पोलिसांना यश आले आहे. पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

जमशेदखान खलील खान (४१, मूळ रा. हैदराबाद, सध्या रा. गोवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून १३ लाख २२ हजार रुपये किमतीचे ११५ ग्रॅम वितळलेले सोने, एक होंडा ॲक्टिव्हा दुचाकी आणि दोन मोबाईल असा एकूण १३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
टिळकवाडी आणि उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोड्यांच्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्तांनी तपासाचे आदेश दिले होते. टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पूजेरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या आरोपीचा शोध घेऊन त्याला जेरबंद केले.
या तपास पथकात पीएसआय विश्वनाथ घंटांमठ, प्रभाकर डोळ्ळी तसेच कर्मचारी महेश पाटील, करलिंगण्णावर व इतर सहकाऱ्यांचा समावेश होता. या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांनी पथकाचे कौतुक केले असून त्यांना बक्षीस जाहीर केले आहे.


Recent Comments