बेळगाव जिल्ह्यातील मरकुंबी येथील इनामदार साखर कारखान्यात बॉयलरचा भीषण स्फोट होऊन पाच कामगारांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेला २४ तास उलटूनही कारखान्याच्या मालकांनी मृतांच्या कुटुंबियांची भेट न घेतल्याने संताप व्यक्त होत आहे.


बैलहोंगल तालुक्यातील या घटनेत अक्षय चोपडे, दीपक मन्नोळी, सुदर्शन बनोशी यांच्यासह पाच जणांचा बळी गेला आहे. विक्रम इनामदार, प्रभाकर कोरे आणि विजय मेटगुड यांच्या भागीदारीतील या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेनंतर नातेवाईकांचा टाहो काळजाला भिडणारा आहे.
घटनेला बराच वेळ उलटला तरी कारखाना व्यवस्थापनाने कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. कामगारांच्या जीवाचे मोल नाही का, असा सवाल नातेवाईक विचारत आहेत. रुग्णालयाच्या आवारात अनेक कुटुंबे न्यायाच्या प्रतीक्षेत अगतिक होऊन बसली आहेत.
बॉयलर स्फोटात शरीर भाजल्याने उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला आणि घराचा आधार हरपला, असे मल्लिकार्जुन यांनी म्हटले. घर बांधण्याचे व लग्नाचे स्वप्न असतानाच ही दुर्घटना घडली, मात्र कारखान्याकडून अद्याप विचारपूस झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
घरचा आधार असलेला मुलगा भरतेश याचा रात्री दोनच्या सुमारास मृत्यू झाला, अशी प्रतिक्रिया बसप्पा सारवाडे यांनी व्यक्त केली.
अत्यंत गरिबी असलेल्या या कुटुंबातील मुलाचा मृत्यू झाल्याने वडिलांना धक्का बसला असून योग्य भरपाई मिळायला हवी, अशी मागणी बसवराज कुन्नूर यांनी केली.
आम्ही आमचा माणूस गमावला असून कारखान्याने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, असे मंजुनाथ तमण्णावर यांनी म्हटले.
काल रात्रीपासून मृत्यूचे वृत्त येऊनही कारखान्याने साधी दखलही घेतलेली नाही. व्यवस्थापनाने तात्काळ हस्तक्षेप करून पीडित कुटुंबांना न्याय द्यावा आणि सुरक्षेचे उपाय योजावेत, अशी मागणी आता जोर धरत आहे.


Recent Comments