लहान मुलांना सोशल मीडियाच्या धोक्यांपासून वाचवण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी त्यांना ऑनलाईन सुरक्षेचे महत्त्व पटवून देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.


मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेबाबत आयोजित जिल्हास्तरीय अधिकारी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. आजची मुले देशाचे भविष्य असून मोबाईलचे व्यसन त्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी मारक ठरत असल्याची चिंता त्यांनी यावेळी व्यक्त केली.

शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मोबाईल आणि लॅपटॉप वापरणाऱ्यांचे प्रमाण ७८ टक्क्यांपर्यंत पोहोचले असून, १४ ते १८ वयोगटातील मुले सोशल मीडियाच्या विळख्यात अधिक अडकत असल्याचे मंत्र्यांनी नमूद केले. विविध विभागांच्या समित्या स्थापन करूनही या समस्येचे निर्मूलन करणे आव्हानात्मक ठरत आहे. त्यामुळे पोलिसांनी दर आठवड्याला शाळा-महाविद्यालयांना भेटी देऊन मुलांमध्ये जागरूकता निर्माण करावी आणि त्यांचे आत्मबळ वाढवावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष शशिधर कोसुंबे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



Recent Comments