सवदत्ती तालुक्यातील मरकुंबी येथील इनामदार साखर कारखान्यात झालेल्या भीषण अपघातात बळी गेलेल्या कामगारांची संख्या आता ७ झाली आहे. यासंदर्भात बेळगावचे पोलीस अधीक्षक रामराजन के. यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली


बुधवारी दुपारी कारखान्याच्या बॉयलिंग हाऊसमध्ये दुरुस्तीचे काम सुरू असताना उकळता द्रव पदार्थ अंगावर पडल्याने ८ कामगार गंभीर भाजले होते. त्यापैकी तिघांचा बुधवारीच मृत्यू झाला होता, तर आज गुरुवारी उपचारादरम्यान आणखी चार कामगारांनी प्राण सोडले. एका कामगाराची प्रकृती अजूनही चिंताजनक असून त्याच्यावर केएलई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी बेळगावचे पोलीस अधीक्षक रामराजन के. यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. ७ जानेवारी रोजी दुपारी १:३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. मृतांमध्ये दीपक मुनवळ्ळी (३२), अक्षय चोपडे (४८), सुदर्शन बनोशी (२५), मंजुनाथ तेरदाळ (३१), गुरुपादप्पा तमण्णावर (३८), भरतेश सारवाडी (२७) आणि मंजुनाथ काजगार (२८) यांचा समावेश आहे. राघवेंद्र गिरीयाल (३६) या कामगारावर सध्या उपचार सुरू आहेत.
या दुर्घटनेला कारखान्याचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी मुरगोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कारखान्याचे जनरल मॅनेजर व्ही. सुब्बुतिनम, इंजिनिअरिंग हेड प्रवीण कुमार आणि डेप्युटी जनरल मॅनेजर एस. बिनोद कुमार यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप ठेवण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः रुग्णालयात जाऊन जखमीची विचारपूस केली असून, रामदुर्ग डीएसपी आणि मुरगोड पीआय या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Recent Comments