सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणाऱ्या जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. प्रशासनाने आपली जबाबदारी पार पाडताना निष्काळजीपणा केल्यास उच्च न्यायालयात दाद मागू, असा इशारा ॲड. ए. डी. नदाफ यांनी दिला आहे.

बेळगाव येथील कन्नड साहित्य भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा प्रशासन सर्वोच्च न्यायालयाच्या नोव्हेंबर २०२५ च्या आदेशाचे उल्लंघन करत असून अनावैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करत असल्याचा आरोप त्यांनी केला. शहरातील सर्व भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करून त्यांना पुनर्वसन केंद्रात हलवावे, असे त्यांनी नमूद केले.
कुत्र्यांना पकडून पुन्हा सोडून देण्याचे कोणतेही आदेश न्यायालयाने दिलेले नाहीत, असे नदाफ यांनी स्पष्ट केले. तसेच, या कामासाठी स्वयंसेवी संस्था किंवा प्राणीप्रेमींची मदत घेण्यापेक्षा प्रशासनाने स्वतः आपली जबाबदारी पार पाडावी, असे त्यांनी सुचवले. सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांचा वावर कमी करण्यासाठी आधी ठोस उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाचा योग्य अभ्यास करावा, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. प्राण्यांवर प्रेम करणाऱ्यांना लहान मुलांचे जीव दिसत नाहीत का, असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. या पत्रकार परिषदेला एम. एम. जमादार, एम. एस. खेमलापूर, डब्ल्यू. एम. शहापुरी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments