राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दलितांच्या हक्काचा ४२ हजार कोटी रुपयांचा निधी लाटल्याचा गंभीर आरोप खासदार रमेश जिगजिणगी यांनी केला आहे. दलितांचा पैसा हडप करणाऱ्यांचे कधीही भले झाले नाही, असे नमूद करत सिद्धरामय्या सध्या दीर्घकाळ मुख्यमंत्री असल्याच्या अहंकारात वावरत असल्याची टीका त्यांनी केली.

विजापूर शहरात माध्यमांशी बोलताना त्यांनी दिवंगत देवराज अर्स यांच्या कार्याची आठवण करून दिली. देवराज अर्स यांनी राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवताना विकासाचे डोंगर उभे केले आणि राज्याला मोठे योगदान दिले, परंतु त्यांच्या निम्म्या इतकेही काम सिद्धरामय्या यांना करता आलेले नाही, असे त्यांनी म्हटले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्याला एकही मोठी देणगी दिलेली नाही, मुख्यमंत्र्यांना थोडी जरी चाड असेल तर त्यांनी राज्याच्या विकासकामांकडे लक्ष द्यावे, अशा शब्दात रमेश जिगजिणगी यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.
सध्या कर्नाटक राज्यात विकासकामांची स्थिती शून्य असून सरकारने राज्याला अधोगतीकडे नेल्याचा आरोप जिगजिणगी यांनी केला आहे. राज्याच्या जनतेला एखादे तरी ठोस योगदान दिले आहे का, असा सवाल करत केवळ विविध ‘भाग्य’ योजनांच्या नावाखाली दिशाभूल करून राज्याची माती केल्याची घणाघाती टीका त्यांनी केली आहे.


Recent Comments