बेळगाव शहरात सेवा देणाऱ्या सर्व रिक्षांना येत्या दोन महिन्यांच्या आत मीटर बसवणे अनिवार्य असल्याचे आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले आहेत. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली रिक्षाचालक आणि संबंधित अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत रिक्षांना मीटर अनिवार्य करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरात सध्या ११ हजार रिक्षा कार्यरत असून, सर्व रिक्षांनी मीटरनुसारच धावणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले की, उद्यापासूनच रिक्षांना मीटर बसवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू करावी. दरमहा किमान ३ हजार रिक्षांना मीटर बसवून त्यावर प्रशासनाचे अधिकृत स्टिकर लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापूर्वी मीटर बसवण्यासाठी एक वर्षाची मुदत देण्यात आली होती, मात्र अद्याप अनेक रिक्षांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे आता उर्वरित सर्व कामे दोन महिन्यांत पूर्ण करावीत, अशी सक्त ताकीद त्यांनी दिली.
या बैठकीला शहराचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्यासह परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मीटर सक्तीमुळे प्रवाशांची होणारी फसवणूक थांबेल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.


Recent Comments