Belagavi

बेळगाव मार्केट यार्डात गाजराचे दर गडगडले

Share

बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्थानिक गाजराचे दर जाणीवपूर्वक पाडण्यासाठी दलाल कुभांड रचत असल्याचा आरोप करत बुधवारी सकाळी शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची वाहने रोखून धरत तीव्र संताप व्यक्त केला.

गेल्या काही दिवसांपासून बेळगाव बाजारपेठेत १० किलो गाजराचा दर ३५० रुपयांवर स्थिर होता. मात्र, हा दर पाडण्यासाठी व्यापाऱ्यांनी मुद्दाम परराज्यातून गाजरांची आयात सुरू केली असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गाजर मागवून येथील दर १० किलोमागे १८० रुपयांपर्यंत खाली आणण्याचा प्रयत्न दलाल करत आहेत. या प्रकारामुळे स्थानिक गाजर उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

या अन्यायाविरुद्ध एकत्र येत शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातून गाजर घेऊन आलेली वाहने बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच रोखून धरली. जोपर्यंत स्थानिक गाजराला कालचे दर मिळत नाहीत आणि परराज्यातील गाजराची खरेदी थांबवली जात नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला.

या आंदोलनामुळे बाजार समितीच्या आवारात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे व्यापारावरही परिणाम झाला असून कृषी विभागाने आणि बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात प्रकाश नायक यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

Tags: