Belagavi

बेळगावात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद थांबणार!

Share

बेळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेली दहशत संपवण्यासाठी महानगरपालिकेने कंबर कसली आहे. सार्वजनिक सुरक्षेसाठी सोमवारपासून व्यापक स्तरावर भटक्या कुत्र्यांच्या पुनर्वसनाची मोहीम राबवली जाणार आहे.

शहरातील गल्लीबोळांत भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडल्याने लहान मुले आणि महिलांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. दुचाकीस्वारांच्या मागे लागणाऱ्या कुत्र्यांमुळे अपघातांचे सत्र सुरू असून, आझाद नगरमधील ताज्या घटनेने नागरिकांचा संताप अनावर झाला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पालिकेने या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधला आहे.

या संदर्भात आमदार आसिफ सेठ यांनी महानगरपालिका आयुक्तांसोबत विशेष बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. हिरेबागेवाडी येथे कुत्र्यांसाठी स्वतंत्र केंद्र तयार करण्यात आले असून, सोमवारपासून शहरातील कुत्र्यांना पकडून तिथे हलवण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कारवाईला गती दिली आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्यावर उपचार करणे आणि त्यांची नसबंदी करणे ही प्रक्रिया आता अधिक वेगाने राबवली जाणार आहे. हिरेबागेवाडी येथील केंद्रात कुत्र्यांची देखभाल करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे बेळगावकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला असून, आता शहरात निर्भयपणे वावरता येईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

Tags: