Belagavi

बेळगावात नवगोबा यात्रा उत्साहात

Share

सौंदत्ती येथील यल्लम्मा गडावर शाकंभरी पौर्णिमा साजरी केल्यानंतर बेळगावात परतलेल्या श्री रेणुका यल्लम्मा देवीच्या भक्तांनी पारंपारिक पद्धतीने नवगोबा यात्रा साजरी केली. यावेळी भाविकांनी परशुरामाला निरोप देण्याची प्रथा मनोभावे पूर्ण केली.

शाकंभरी पौर्णिमेनिमित्त सौंदत्ती गडावर श्री रेणुका यल्लम्मा देवीची यात्रा संपवून बेळगावात परतलेल्या भाविकांनी आणि मंदिर कमिटीने किल्ला तलावाजवळ नवगोबा यात्रेचे आयोजन केले होते. यावेळी देवीला भंडारा अर्पण करून, परडी भरून आणि चौरी नाचवत भाविकांनी आपली भक्ती समर्पित केली. जोगती आणि भक्तांनी चौंडक्याच्या पदांसह आरती ओवाळून देवीचा जयघोष केला.

जमदग्नी ऋषींची पत्नी आणि सात दऱ्यांची स्वामिनी श्री सौंदत्ती यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी येणारे भक्त सुखरूप घरी पोहोचावेत आणि चिरंजीवी परशुरामाने त्यांचे रक्षण करावे, असे वचन देवीने दिले असल्याची मान्यता आहे. त्यानुसार भार्गवराम भक्तांसोबत त्यांच्या गावापर्यंत येतो आणि भक्तांची आज्ञा घेऊनच आपल्या स्थानी परततो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच पार्श्वभूमीवर कनकदास नगर, कुंती नगर आणि जुने बेळगाव भागातील भाविकांनी पुन्हा एकदा परडी भरून परशुरामाला निरोप दिला. भक्तांच्या सुरक्षिततेसाठी ही परंपरा पूर्वापार चालत आली असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमानंतर आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. यावेळी रमाकांत कोंडुस्कर, मंदिर पंच कमिटीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

Tags: