बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागात यंदा रब्बी हंगामातील पिके जोमात आली असून शेतशिवाराला नवी झळाळी प्राप्त झाली आहे. हरभरा, ज्वारी आणि वाटाणा पिकांसोबतच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मोहरीचे उत्पादन घेतले आहे.


सध्या मोहरीची झाडे फुलांनी बहरली असून संपूर्ण शेत जणू पिवळ्या धमक चादरीने वेढल्यासारखे भासत आहे. दूरवर पसरलेली ही पिवळी सृष्टी पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहे. बेळगावच्या शेतात मोहरीच्या फुलांच्या रूपाने जणू भंडाऱ्याची उधळण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पहाटेचा गारवा आणि धुक्याच्या दुलईत निसर्गाचे हे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी निसर्गप्रेमी शेतांकडे धाव घेत असून, पक्ष्यांचा किलबिलाट आणि हिरव्या-पिवळ्या रंगाची ही उधळण मनाला प्रसन्न करत आहे.

यंदा हरभरा आणि इतर रब्बी पिकांसाठी हिवाळ्यातील पोषक वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. गुलाबी थंडी आणि पहाटेचे दव पिकांच्या वाढीसाठी तसेच जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पूरक ठरत आहे. शेतकऱ्यांचे कष्ट आणि निसर्गाची साथ यामुळे बेळगावचे कृषी वैभव पुन्हा एकदा प्रकर्षाने दिसून येत आहे.


Recent Comments