चिक्कोडी तालुक्यातील पट्टणकुडी येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात समुदाय भवन उभारण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या वास्तूचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी दिली .

पट्टणकुडी येथे श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतल्यानंतर हुक्केरी यांनी मंदिर समितीच्या सदस्यांना एक कोटी रुपयांच्या निधी मंजुरीचे अधिकृत आदेश पत्र सुपूर्द केले. यावेळी बोलताना त्यांनी ग्रामस्थांची अनेक दिवसांची मागणी आता पूर्ण झाल्याचे सांगितले. आमदार गणेश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा निधी मिळाला असून, भविष्यात या समुदाय भवनासाठी अतिरिक्त एक कोटी रुपये मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. तसेच पट्टणकुडी ते नाईंग्लज रस्ते विकासासाठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, महालक्ष्मी उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यातील पाणी जून महिन्यापर्यंत पोहोचवले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामस्थ आणि भाविकांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी आमदार गणेश हुक्केरी आणि प्रकाश हुक्केरी यांनी तत्परता दाखवली आहे. त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया गावातील नेते विद्याधर कागे यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष सुकुमार डिग्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शांताराम एणटहत्तीनवर, के. के. बडिगेर, बी. बी. बेडकीहाळे उपस्थित होते. तसेच मंदिर समितीचे अध्यक्ष राजकुमार सुलतानवर, सुधाकर चंदुगडे, रामगोंडा खोत, शशिकांत अक्कोळे, सुरेंद्र चिलायी, अनिल माळी, नवलेप्पा बन्ने, लखन परीट, अशोक गौराई, बाळासाहेब कागे, पीडीओ के. ए. मोमीन आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.


Recent Comments