Belagavi

डीसीसी बँकेचा वापर राजकीय सूडासाठी; महांतेश कडाडी

Share

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सध्या राजकीय आखाडा बनली असून, माजी मंत्री रमेश जारकीहोळी हे आमदार लक्ष्मण सवदी यांच्यावरील राजकीय द्वेषापोटी बँकेचा गैरवापर करत असल्याचा गंभीर आरोप डॉ. महांतेश कडाडी यांनी केला आहे.

सवदी यांच्याकडून सतत होणाऱ्या पराभवामुळे हताश होऊन जारकीहोळी आता सवदी समर्थक आणि शेतकऱ्यांना त्रास देण्यासाठी गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र रचत असल्याचे डॉ. महांतेश कडाडी म्हणाले.

बँकेच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना कडाडी यांनी सांगितले की, नवीन संचालक मंडळ सत्तेवर आल्यापासून ठेवीदारांचा बँकेवरील विश्वास कमी झाला आहे. नियबाह्य पद्धतीने कर्जवाटप आणि कर्जमाफी केली जात असल्याचा परिणाम म्हणून ठेवीदारांनी बँकेतून सुमारे १,२३४ कोटी रुपये काढून घेतले आहेत. गोकाक पद्धतीचे दडपशाहीचे राजकारण संपूर्ण जिल्ह्यात पसरवले जात असून, बँक कर्मचाऱ्यांनी राजकारण्यांचे गुलाम न होता संस्थेशी एकनिष्ठ राहावे, असा इशारा त्यांनी दिला.

डीसीसी बँकेत होणाऱ्या आगामी नोकरभरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. पात्र उमेदवारांकडून पैसे उकळून भरती करण्याचा घाट घातला जात असून, या अन्यायाविरुद्ध कर्मचारी आणि जनतेने लढा देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय सूडबुद्धीसाठी बँकेचे भविष्य पणाला लावू नका, अशी मागणी डॉ. महांतेश कडाडी यांनी केली आहे.

Tags: